माझ्या ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे.


नमस्कार. मी आनंद वामन कुलकर्णी..... वेगळा विचार नावाचा इंटरनेटवर ब्लॉग सुरु करावा आणि त्यावर मी काही लिहावे इतका काही मी मोठा नाही. माझ्या या लिखाणातून फार मोठे सामाजिक परिवर्तन घडावे, असेही नाही. पण, तरीही मला हे करावेसे वाटले कारण विचारांची देवाणघेवाणच माणसाचं वैचारिक विश्व समृध्द बनवत असते. माझ्या एका व्हॉटस अँप पोस्टवर माझ्या खूप मित्रांनी माझ्याकडून अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. या सगळ्यांचा विचार करुन हा ब्लॉग चालविण्याचा प्रयत्न कऱणार आहे.

माझा जन्म 22 मे 1968 रोजी कर्नाटकात बेळगाव जिल्ह्यातील आणि अथणी तालुक्यातील उगार खुर्द या गावी झाला. माझ्या आईचे ते माहेर म्हणून मी तिथे जन्माला आलो यापेक्षा त्यात फार वेगळे लक्षात रहावे असं काही नाही. माझे वडिल वामन काशिनाथ कुलकर्णी आणि आई सौ. अनुराधा हे दोघेही अतिशय उत्तम गृहस्थी होते. सुरुवातीला इचलकरंजीत माझ्या बालपणाची काही वर्षे गेली आणि नंतर 1973 पासून आम्ही जयसिंगपूरला रहायला आलो. सर्वसामान्य अशाच पध्दतीने माझे बालपण होते. प्राथमिक शिक्षण जयविजय विद्यामंदिर आणि माध्यमिक शिक्षण जयसिंगपूर हायस्कूल येथे झाले. दहावीनंतर कराडच्या शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातून मी औषध निर्माणाची पदविका घेतली.

पण, पुढं माझ्या वाटचालीला वेगळंच वळण लागलं. अगदी अपघातानं मी पत्रकारीतेत गेलो. 1985 ला इचलकरंजीच्या मँचेस्टर या दैनिकाचा जयसिंगपूर वार्ताहर म्हणून सुरुवात झाली. पुढे दैनिक पुढारी, दैनिक सामना, दैनिक जनप्रवास, दैनिक तरुण भारत(बेळगाव), दैनिक तरुण भारत (सोलापूर) साठी जयसिंगपूर वार्ताहर म्हणून काम केले. त्यानंतर चिपळूणच्या कोकण केसरीनं मला उपसंपादक होण्याची संधी दिली. नंतर तरुण भारत कोल्हापूर, पुढारी सांगली इथेही संपादकीय विभागात विविध पदांवर काम केले. कोल्हापूर मधून प्रसिध्द होणा-या शिवराज या मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणूनही काम केले. .नंतर 1996 मध्ये मी या क्षेत्रापासून दूर होण्याची प्रक्रिया सुरु झाली आणि 2010 मध्ये सांगलीच्या दैनिक महाराष्ट्र पश्चिम या दैनिकाच्या कार्यकारी संपादक पदाचा त्याग करुन मी या क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला.या वाटचालीत मी केलेल्या कामाचं आजही कौतुक होतं आणि मला त्यामुळे आज आदराची वागणूक मिळते याचा मला आनंद आहे.

या दरम्यान मार्केटिंग सुरु होते. गव्हांकूर चूर्ण विकणे, नेटवर्क मार्केटिंगच्या विविध कंपन्यात नशीब आजमावणे सुरु होते. चेन्नईच्या कोनिबायो हेल्थ केअर या कंपनीने माझ्या नशीबाची दारं उघडली आणि मी या नेटवर्क मार्केटिंगच्या कंपनीत डायमंड झालो. स्वप्न साकारले. पण, सगळ्या नेटवर्क कंपन्यात होतं तसंच इथही झालं आणि मी यातून बाहेर पडलो. नंतर आरोग्य तंत्र या नावाचे मासिक सुरु केले पण ते दीड वर्षातच आर्थिक समस्येने गुंडाळावे लागले. त्यानंतरच्या काळात माझी खूपच फरफट झाली. मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या मी पिचलो.

पण, याच काळात सोलापूरचे माजी खासदार आदरणीय श्री. सुभाषजी देशमुख (बापू) यांच्या संपर्कात मी आलो  इतका मोठा माणूस पण एक दिवस माझ्या घराला त्यांचे पाय लागले. सुमारे तासभर त्यांनी माझं सगळं ऐकलं आणि मी त्यांच्या लोकमंगल मल्टिस्टेट को. ऑप.सोसायटीमध्ये सांगलीचा विभागीय अधिकारी म्हणून 1 फेब्रुवारी 2012 ला समाविष्ट झालो. सन 2012 च्या दिवाळीच्या आधल्या दिवशी मला मोठा अपघात झाला आणि पुढे कालांतराने लोकमंगलची ही नोकरीही मला सोडावी लागली. नंतर मी कळंबच्या शुभकल्याण मल्टिस्टेट को.ऑपरेटिव्ह सोसायटीच्या जयसिंगपूर शाखेत शाखाधिकारी म्हणून काम केले. तिथल्या वातावरणात मन रमले नाही आणि मी बाहेर पडलो. याच काळात वक्ता म्हणून नावाजला गेलो. क्रांतिकारकांच्या चरित्रावर, व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य अशा अनेक विषयावर हजारो व्याख्यानं दिली. शेकडो कविता लिहिल्या. खूप भटकंती केली. सामाजिक कामात पुढाकार होताच पण, भारतीय जनता पक्षाचा प्रथम जयसिंगपूर शहराध्यक्ष आणि नंतर कोल्हापूर जिल्हा चिटणीस म्हणून राजकारणाचाही कित्ता गिरवला. अखिल भारतीय हिंदु महासभेचा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रदेश प्रवक्ता म्हणूनही काम केले. जयसिंगपुरात वीर सावरकर नागरी सहकारी पत संस्था या नावाची संस्था जन्माला घातली. गेली आजही ती व्यवस्थित सुरु आहे. विश्व हिंदू परिषदेचा शहर मंत्री म्हणूनही काम केले. आता आनंद कुलकर्णीज नॅचरोपॅथी अशी माझी स्वतःची फर्म आहे. निसर्गोपचार सल्लागार म्हणून काम करतोय. लोकांच्या शारीरिक वेदनांवर माझ्या ज्ञानानुसार मलमपट्टी करुन वेदना कमी करण्याचा प्रयत्न करतोय. इथ मात्र एक वेगळंच समाधान आहे. स्वतःचा व्यवसाय असल्याने स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यात हळूहळू स्थिरावत चाललोय.
या सगळ्या घडामोेडी मागे टाकल्या त्या एका शाश्वत संधीने. सज्जनगडावरील श्री. समीरबुवा रामदासी यांच्या माध्यमातून श्री. मोहनबुवा रामंदासी यांच्या संपर्कात आलो. 2015 च्या गुरुद्वादशीला श्री क्षेत्र सज्जनगडावर समाधीजवळ श्री समर्थांचा आशीर्वाद मिळाला आणि तन मनाचे सोने झाल्याची जाणीव झाली. आजवरच्या खटाटोपातील व्यर्थता लक्षात आली आणि नेमके हित कशात आहे याची जाणीव झाली. साधक भावे नमस्कार घाली । त्याची चिंता साधूस लागली । सुगमपंथे नेवून घाली । जेथिल तेथे ।। यावर श्रध्दा जडली आहे.
या सगळ्या प्रवासात खूप वाचलं, अनेक माणसं जवळून अनुभवली. चेहरे आणि मुखवटे पाहिले. अनेकांनी उपयोग करुन घेतला. काहींनी लुटलंही. पण, यातून मला शिकायलाही मिळालं. जिवाला जीव देणारी माणसंही मिळाली. परिस्थिती माणसाला खरं शहाणपण शिकवते हे अनुभवलं. आपलं खरंच कोण हे नीरक्षीर विवेक न्यायानं आपोआप सिध्द झालं.

असं माझं हे आयुष्य.... अनेक चढउतारांचं आणि वळणावळणाचं....... खूप काही हिरावून घेऊन गेलेलं पण त्यापेक्षा कितीतरी देऊन गेलंलं. आर्थिकदृष्ट्या समृध्दी नसली तरी मनाची श्रीमंती आणि विचारांची प्रगल्भता देऊन गेलेलं. जगण्याचा खरा अर्थ उमगला नसला तरी जे जगलो त्याचा पश्चात्ताप करावा, असंही वाटलं नाही. म्हणूनच असामी नाही पण ........ नक्कीच असा मी.......................!!!

आनंद कुलकर्णी
तुमचा मित्र... अगदी हक्काचा.......



2 comments:

  1. सर्वाना तुमच्या अनुभवातून शिकण्यासारखे आहे.

    ReplyDelete

पुतण्याची पॉवर काका पेक्षा भलतीच जादा की....!!

खा. शरद पवार यांच्या राजीनामा नाट्याचा शेवट आज अपेक्षेनुसारच झाला. त्यांनी आ. अजित पवार यांना एकट पाडून यातून धडा शिकवला अशा स्वरुपाची चर्चा...